14 June 2021

मजसाठी एवढं करशील ना !

 जागतिक रक्तदान दिनानिमित्त लेख...


मजसाठी एवढं करशील ना !


           विश्वात्मक औदार्य हे नाव तस अतिसुंदर, अर्थही व्यापकच आहे. पण प्रत्येक मनामनात दातृत्वाची वृत्ती जागृत करणे, हे मात्र कठीण काम आहे. 

          भारतीय परंपरेत दानाला विशेष महत्व आहे. जेवणापूर्वी अन्न हे पूर्णब्रम्ह समजून एक घास भुकेलेल्याला देतात. कुणी तहानेने व्याकुळ वाटसरूला थंड पाण्याने तृप्त करतात. गायीच्या पोटात देवाचं वास्तव्य आहे म्हणून तिला नैवद्य दाखवितात. रोग्याला औषध दिल जाते, मुलांना शाळेत टाकलं जाते, त्यांचा खर्च उचलला जातो, विनामोबदला कसलीही अपेक्षा न करता हे सर्व करणारा कनवाळू आजही आपल्यात आहे. हे दान धर्माचे कार्य पुण्य घडावे म्हणून पूर्वीपासून चालत आलेले आहे. मानवजीवनात मनुष्यजन्म सार्थक ठरावा, यासाठी माणूस जन्मभर अविरतपणे धडपडत असतो. समाधानाच्या शोधात जणू तो प्रेमाने स्नेहबंधाची पेरणीच करीत असतो. प्रेमाने जग जिकता येते, असे म्हणतात ते उगाचच नाही.

          दान कुठलंही असो ते सात्विक, सोज्वळ आणि अंतःकरणापासून असावं. आज ज्यांच्या जवळ अन्न, वस्त्र आणि निवारा नसणारेही अनेक कुटुंब आहे. अशांना सेवाभावी लोकांकडून नेहमीच मदत केली जाते. अन्नदान, वस्त्रदान, नेत्रदान अवयवदान याप्रमाणेच एक पवित्र दान म्हणजे रक्तदान.

आपण आपल्यातल्या मानवी मूल्यांना जागृत करून सामाजिक बांधिलकी म्हणून स्वैच्छिक रक्तदान करीत असतो. आजही माणसाचा परमेश्वरावर प्रचंड विश्वास आहे. आपल्या धार्मिक संस्कृतीने म्हणा की आईने आपल्यावर केलेल्या संस्काराने म्हणा, पण आपण सामाजिक नितीमूल्याची जाणीव ठेऊनच वागतो. सर्वांच्या वर्तनात साम्य जरी नसेल तरी साधेपणा आणि विवेकबुद्धी नक्कीच आहे. एकमेकांचा आपण किती आदर करतो. इतरांशी कसे वागतो, यावरच मानवी मूल्याचे मापन होत असते. मानवी मूल्याची जपणूक होण्यासाठी रक्तदान दिनासारखे दिवस साजरे करणे गरजेचे आहे.

          १४ जून हा जागतिक रक्तदान दिवस म्हणून संपूर्ण जगात साजरा होत असतो. यादिवशी रक्तदाते स्वैच्छिक रक्तदान करून मानवता जपत असतात. मदत करणे हा प्रत्येक मानवाचा गुणधर्म आहे. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या वेळी कुणाला तरी मदत करीत असतात. रक्तदान हेच श्रेष्ठदान........या वृत्तीने अनेक जण रक्तदान करीत असतात. काहीजण रक्तापलीकडे जाऊन रक्ताची नाती जपतात आणि मानवतेच मोठं वलय निर्माण होते. याच वलयातून माणूस एकमेकांना जोडला जातो, आणि सामूहिक प्रगती सुरू होते. जीवनाच्या सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजूने विचार करण्याची क्षमता येते. एकंदरीत जगणे सुंदर होते. मानवता जीवन जगण्याचा मार्ग दाखवते. मानवता जोपासण्याचा आणि आचरणात आणण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे रक्तदान आहे.

          दैनंदिन जीवनात लोक अनेक प्रश्नाने चिंतित असतात.  मनाला स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. आनंदी राहण्यासाठी अनेक जण स्वतःला कामात व्यस्त ठेवतात. छंद जोपासतात, कुणी मनाच्या समाधानासाठी गरजवंताची सेवा करतात, कुणी दान देतात, या ना त्या कारणावरून सामाजिक बांधिलकी जोपासत असतात. 

         जे निरोगी, तंदुरुस्त आहे, कुणासाठी काहीतरी करूच अशी भावना मनात आहे त्यांनी जरूर रक्तदानाचा निर्णय घ्या. आवड म्हणून व छंद म्हणून नाही तर गरजवंतांना मदतीचा एक हात म्हणून शक्य असलेल्यांनी रक्तदान करा.

               थँलिसीमिया, सिकलसेल ग्रस्त मुलांना नेहमीच रक्ताची गरज असते. रक्त या विषयाला घेऊन अश्या मुलांच्या घरचे घाबरलेले असतात. दुःखामुळे त्या पालकांच्या जीवनातलं समाधान लोप पावलेल असत. आपण आपलं रक्तदान करून त्यांच्या प्रश्नावरचा उपाय होऊ शकतो. त्या मुळे उदासीनतेच्या गर्तेत जगणाऱ्या तरुणांच्या चेहऱ्यावर आपण कुणाच्या कामी आलो या जाणिवेने नक्कीच समाधान येईल.

            रक्ताची गरज सर्वालाच असते. कुणाला रक्त पाहीजे असते. तर कुणाला दान द्यायचे असते. प्रत्येकांच्या शरीरात असलेल्या या रक्तामुळे आज कित्येकांना जिवनदान मिळाले आहे. रक्तदानातून नवजीवन मिळणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. पण जेव्हा कुण्या जवळील जिवाभावाच्या  व्यक्तीला रक्ताची गरज भासते तेव्हाच त्यांना रक्ताची खरी किंमत कळते. मिञा तुमच्यासाठी काहीपण म्हणनारे देखील अशा वेळी कामी पडत नाही. त्या वेळी दाखवलेली हिम्मत म्हणजे रक्तदान होय. ज्याला सर्वश्रेष्ठ दान असेही म्हणतात. 

            आपलं दुःख बाजूला ठेऊन दुसऱ्यासाठी केलेल्या कृतीतून मिळणार समाधान खूप महान असते, याला आपण समृद्ध जगणं म्हणू शकतो.


          दान करू रक्ताचे

     बीज रुजवू समाधानाचे।।


          रक्तदान असो, नेत्रदान किंवा अवयवदान या मुळे रुग्णाची रोगावर यशस्वी मात होते आणि रुग्णाला आपल्या आयुष्यात चैतन्य भरण्यासाठी उभारी मिळते. त्यामुळे जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतेचा अखंड प्रवाह वाहतो. 


 "दानाचा संकल्प करूया.....

           जीव वाचवूया"......


            दानामधून दान देणारा आणि घेणार दोघेही संतुष्ट होते. ज्या देवांवर ते विश्वासा ठेवतात, त्यांचे स्मरण करून नवीन आयुष्याला सुरुवात करतात. दातृत्वामुळे जन्मांतरीच्या लाभणाऱ्या समाधानाने माणसातच देव असल्याची साक्ष मिळते. म्हणून आपल्याजवळ असलेल्यातल थोडस दान करायलाच पाहिजे.  

         मजसाठी एवढं करशील ना! असे म्हणणारे थँलेसमिया, सिकलसेल रुग्ण सुखाने जगताना दिसेल.


             शब्दांकन:प्रफुल भोयर

                   (यवतमाळ)

             मो.न. 7057586468


दैनिक विदर्भ मतदार 


दैनिक सिहझेप


दैनिक लोकशाही वार्ता

दैनिक जनसंग्राम 


#दैनिक सुपर भारत
#दैनिक तरुण भारत

https://epaper.tarunbharat.net/article.php?mid=Mpage_2021-06-14_8483ee16b7af947da37422b16709c02460c69589796fb

सदर लेख जागतिक रक्तदान दिनानिमित्त १४ जून २०२१ ला दैनिक विदर्भ मतदार, सिहझेप, लोकशाही वार्ता, जनसंग्राम यवतमाळ  मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

मजसाठी एवढं करशील ना !.... हा लेख प्रकाशित करुन तुम्ही जी मानवतेला वंदना केली आहे, ती अनमोल आहे. आज ना उद्या लोकांना रक्तदानच महत्व कळेलच. पण या मुळे रक्तदान करणार्यांना रक्तदान केल्याचा आनंद आणि आणि उगवत्या युवा पिढीला प्रेरणा मिळेल, हे नक्कीच.




1 comment:

  1. अप्रतिम लेखन, प्रफुल खूप छान...

    ReplyDelete

कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...