स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा लॉ कॉलेजमध्ये 'आकल्प आयुष्य व्हावे' भव्य रक्तदान जनजागृती मोहीमेचे उद्घाटन
यवतमाळ:- युवा ऊर्जेचा आणि सामाजिक जाणिवेचा एक अनमोल आदर्श ठरेल अशी 'आकल्प आयुष्य व्हावे' रक्तदान मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ यवतमाळ येथे आकल्प आयुष्य व्हावे या भव्य रक्तदान जनजागृती मोहिमेचे उदघाटन कॉलेजचे माननीय प्राचार्य डॉ. विजेश मुनोत सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या मोहिमेचे नेतृत्व करणारे प्रेरणादायी विद्यार्थी प्रफुल भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू झाला आहे. मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य महोदयांनी माहितीपत्रकाचे अनावरण करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. अनेक रक्तदाते आणि विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागातून सुरू झालेल्या या रक्तदान मोहिमेचा उद्देश समाजातील गरजू रुग्णांसाठी जीवनदायी रक्त उपलब्ध करून देणे आणि युवा पिढीमध्ये रक्तदानाची संस्कृती रुजवणे हा आहे.
“रक्तदान हे केवळ दान नाही, तर मानवतेचे सर्वोच्च कर्तव्य आहे. 'आकल्प आयुष्य व्हावे' या संकल्पनेतून एकत्र येऊन जीवन वाचवण्याच्या महान कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रक्तदात्याच्या रक्तातून एखादे कुटुंब सुखी होऊ शकते, हा विश्वास पाठीशी ठेऊन जनजागृती करण्यात येत आहे.”
स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ च्या प्राचार्यांनी विद्यार्थ्याच्या मोहिमरूपी सामाजिक जाणिवेचे कौतुक केले. “जवाहरलाल दर्डा लॉ कॉलेज केवळ कायद्याचे शिक्षण देणारेच नाही तर सामाजिक बांधिलकी जोपासणारे विद्यार्थी घडवतात. प्रफुल सारख्या जिद्दी विद्यार्थ्यांमुळे ही मोहीम निश्चितच यशस्वी होईल, असा आशावाद व्यक्त केला.
ही मोहीम केवळ महाविद्यालयीन पातळीवर मर्यादित न राहता, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध माध्यमांमार्फत पोहोचवण्यात येणार आहे, जेणेकरून सर्व युवा पिढीला प्रेरणा मिळेल. या उद्घाटन प्रसंगी डॉ. नितीन कोथळे, प्रा. पल्लवी हांडे, प्रा. वंदना पसारी, प्रा. नंदिनी अदमाने व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

0 Comments