जवळा येथे आयोजित महामेळावा तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
◆ मेळाव्यात 27 विभागाचे राहणार 40 स्टॅाल
◆लाभार्थ्यांना विविध लाभाचे वितरण होणार
यवतमाळ, दि. 24 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने दि.2 मार्च रोजी आर्णी तालुक्यातील जवळा येथे शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती या मेळाव्यास उपस्थित राहणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी तयारीचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल नहार, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर, यवतमाळ व आर्णी तालुक्यातील तहसिलदार, गटविकास अधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मेळाव्यात विविध विभागाचे एकून 40 स्टॅाल राहणार आहे. या स्टॅालमध्ये संबंधित विभागाच्यावतीने त्यांच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांना दिली जातील. बहुतांश विभागाच्या योजनांचा प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. मेळाव्यास 2 हजार लाभार्थ्यांच्या उपस्थितीचे नियोजन करण्यात आले आहे.
शिबिरातील स्टॅालचे नियोजन, बैठक व्यवस्था, येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पाणी, मंडप, स्वच्छतागृह आदींचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. विभागांनी याठिकाणी लाभ वितरण करावयाच्या शेतकऱ्यांची यादी तयार करून सादर करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले. शिबिरात महिला व बालविकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद अभियान, पशुसंवर्धन विभाग, आदिवासी विकास विभाग, वन विभाग, जिल्हा अग्रणी बॅंक, कौशल्य विकास विभाग, नगरविकास, नगरपरिषदा, आरोग्य विभाग, समजाकल्याण विभाग, महाराष्ट्र उर्जा विकास प्राधिकरण, विद्युत विभागा आदी 27 विभागांचे एकून 40 स्टॅाल राहणार आहे.
शिबिरात या विभागांच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध होण्यासोबतच तहसिल कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, त्यात उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, नॉन क्रिमिलिअर तसेच अधिवास व सातबारा इत्यादी तसेच पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना जसे घरकुल, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रम, समाजकल्याण मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा थेट लाभ लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.
जास्तीत जास्त नागरीकांनी रविवार दि. 2 मार्च रोजी श्री. गुरूदेव विद्या मंदीर व कनिष्ठ महाविद्यालय मौजा जवळा, ता. आर्णी, येथे होणाऱ्या सदर शासकिय सेवा व योजनांचा महामेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल नहार यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment