27 February 2025

मराठी भाषेची संघर्ष ज्योत मनात पेटत ठेवा - डॉ. किशोर बुटले



◆ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लाॅ मध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

यवतमाळ – स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा लॉ कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी भाषेच्या समृद्ध वारशाचा गौरव करत कविवर कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला महाविद्यालया चे प्राचार्य डॉ. विजेश मुनोत अध्यक्ष स्थानी होते. अमोलकचंद महाविद्यालया चे मराठी विभाग प्रमुख डॉ. किशोर बुटले मुख्य अतिथि होते. 

प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत मराठी भाषेच्या संवर्धनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. किशोर बुटले यानी मराठी भाषा संवादाचा विषय असून वादाचा नाही असे  म्हणून मराठी भाषेची संघर्ष ज्योत मनात पेटत ठेवन्या चे आव्हान उपस्थितांना केले व विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा गोडवा व महत्त्व विशद केले. मराठी भाषेच्या जतनासाठी तरुण पिढीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन ही प्रमुख वक्त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन डॉ. स्वप्निल सगने सर यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. वैशाली फाले यांनी केले.

 या कार्यक्रमास प्रा. अंजली दिवाकर, प्रा. वंदना पसारी, प्रा. पल्लवी हांडे,  डॉ. सुमीता आडे, प्रा. मृणाल काटोलकर,  विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण महाविद्यालयात मराठी भाषेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले होते.





24 February 2025

संविधानाची मुलभूत संरचना जोपासने गरजेचे - डॉ. मांडवकर

संविधानाची मुलभूत संरचना जोपासने गरजेचे - डॉ. मांडवकर


यवतमाळ- विद्या प्रसारक मंडळ संचालीत स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालयात संविधान गौरव महोत्सवा अंतर्गत "सर्वोच्च न्यायालयाच्या मूलभूत रचनेच्या सिद्धांताची उत्क्रांती - भारतीय लोकशाहीमध्ये त्याची प्रासंगिकता." या विषयावर नरहर बळवंत ठाकूर विधी महाविद्यालय नाशीक चे उप प्राचार्य डॉ. संजय मांडवकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रम हा अॕड. रामकृष्ण जी राठी विधी महाविद्यालय वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. डॉ. संजय मांडवकर यांनी संविधानाच्या मुलभूत संरचना यासंदर्भात निर्माण झालेली परिस्थिती , सर्वोच्च न्यायालयासमोर वेळोवेळी निर्माण झालेले सांविधानिक प्रश्न , संसद आणि न्यायपालीकेच्या कामकाजाच्या मर्यादा यावर शंकरीप्रसाद, सज्जनसींग , गोलखनाथ, केशवानंदा भारती , ईंदीरा नेहरू गांधी विरुध्द राजनारायण, मिनर्वा मिल्स ईत्यादी केसेस चा संदर्भ देत संविधानाच्या मुलभूत सिद्धांताची मांडणी कशी झाली यावर विस्तृत विवेचन केले. 

      भारतीय लोकशाही टिकविण्यासाठी, नागरीकांच्या मुलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी  तसेच संविधानाची प्रतीष्ठा ऊन्नत राखण्यासाठी मुलभूत संरचना जपणे किती महत्त्वाचे आहे यावर भाष्य केले. अन्यथा राजकीय पक्ष  स्वार्थासाठी संविधानाची मोडतोड करून लोकशाही ध्वस्त करतील याची हमी देता येत नसल्याचे विवेचन केले. कार्यक्रमाला अध्यक्ष अॕड. रामकृष्णजी राठी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  प्रकाश दाभाडे यांनी विषयानुरूप अध्यक्षीय मार्गदर्शन केले. प्रास्तविक  प्राचार्य डॉ. विजेश मुणोत यांनी केले . कार्यक्रमाचे संचालन आयक्युएसी समन्वयक डॉ.  संदीप नगराळे ह्यांनी तर डॉ . सुशांत चिमणे यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी दोन्ही महाविद्यालयाचे शिक्षक तसेच विद्यार्थी यांची उपस्थिती होती.







23 February 2025

जवळा येथे आयोजित महामेळावा तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा....

जवळा येथे आयोजित महामेळावा तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

◆ मेळाव्यात 27 विभागाचे राहणार 40 स्टॅाल

◆लाभार्थ्यांना विविध लाभाचे वितरण होणार


यवतमाळ, दि. 24 (जिमाका) :  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने दि.2 मार्च रोजी आर्णी तालुक्यातील जवळा येथे शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती या मेळाव्यास उपस्थित राहणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी तयारीचा आढावा घेतला.

   यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल नहार, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर, यवतमाळ व आर्णी तालुक्यातील तहसिलदार, गटविकास अधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

   मेळाव्यात विविध विभागाचे एकून 40 स्टॅाल राहणार आहे. या स्टॅालमध्ये संबंधित विभागाच्यावतीने त्यांच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांना दिली जातील. बहुतांश विभागाच्या योजनांचा प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. मेळाव्यास 2 हजार लाभार्थ्यांच्या उपस्थितीचे नियोजन करण्यात आले आहे. 

   शिबिरातील स्टॅालचे नियोजन, बैठक व्यवस्था, येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पाणी, मंडप, स्वच्छतागृह आदींचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. विभागांनी याठिकाणी लाभ वितरण करावयाच्या शेतकऱ्यांची यादी तयार करून सादर करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले. शिबिरात महिला व बालविकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद अभियान, पशुसंवर्धन विभाग, आदिवासी विकास विभाग, वन विभाग, जिल्हा अग्रणी बॅंक, कौशल्य विकास विभाग, नगरविकास, नगरपरिषदा, आरोग्य विभाग, समजाकल्याण विभाग, महाराष्ट्र उर्जा विकास प्राधिकरण, विद्युत विभागा आदी 27 विभागांचे एकून 40 स्टॅाल राहणार आहे.

   शिबिरात या विभागांच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध होण्यासोबतच तहसिल कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, त्यात उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, नॉन क्रिमिलिअर तसेच अधिवास व सातबारा इत्यादी तसेच पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना जसे घरकुल, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रम, समाजकल्याण मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा थेट लाभ लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.

   जास्तीत जास्त नागरीकांनी रविवार दि. 2 मार्च रोजी श्री. गुरूदेव विद्या मंदीर व कनिष्ठ महाविद्यालय मौजा जवळा, ता. आर्णी, येथे होणाऱ्या सदर शासकिय सेवा व योजनांचा महामेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल नहार यांनी केले आहे.


स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ च्या शैक्षणिक सहलीमधे येरवडा कारागृहाला भेट.....

स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ च्या शैक्षणिक सहलीमधे येरवडा कारागृहाला भेट


यवतमाळ: स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ ची शैक्षणिक सहल नुकताच ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन उत्साहात पार पडली. चार दिवसाच्या या सहलीत विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक स्थळांच्या अभ्यासासह प्रेक्षणीय स्थळांवर सहलीचा आनंद लुटला. कायद्याच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील व्यावसायिक सरावासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास व्हावा या उद्देशाने  पुणे येथील ऐतिहासिक येरवडा मध्यवर्ती कारागृह, महिला कारागृह, खुले कारागृहाला भेट दिली.  कारागृहात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना सुधारणे, पुनर्वसन, शिक्षण, आणि कल्याणासाठी काम कसे करतात, याचे निरीक्षण कायद्याच्या विद्यार्थ्यांना करता आले. कारागृहाची प्रक्रिया आणि कार्यपद्धती विद्यार्थ्यांनी समजून घेतल्या, कायदेविषयक शिक्षणाची गरज पाहता येरवडा येथील तुरंग भेट विशेष आकर्षण ठरले.

 तसेच पुणे मधील शनिवार वाडा, दगडूशेठ गणपती, लाल महाल, तुळशीबाग, राजीव गांधी राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय कात्रज, अलिबाग मुरुड समुद्र किनारा, काशीद किनारा, मुरुड-जंजिरा किल्ला, कार्ला लेणी आणि एकविरा देवस्थान लोणावळा याठिकाणीही भेट दिली. मुरुड जंजिरा किल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहता तेथील इतिहास समजून घेतला. 

      या सहली मधे डॉ. स्वप्निल सगणे, डॉ. वैशाली फाळे, मनोज गौरखेडे, राजेश राठोड यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत मेहनत घेतली, तर या सहली करिता प्राचार्य डॉ. विजेश मुनोत, डॉ. संदीप नगराळे यांचे मार्गदर्शन लाभले.

असा हा रक्तविर....

 असा हा रक्तविर....


भावना असतात मूल्य

मनी जपणे आस लागो 

चळवळींना श्वास देण्या 

कळकळीची साथ लाभो


मी अनावर एकटा 

असे कलश डोई

नको  मग यातनांचा

कुणा भार लागो

चळवळींना श्वास देण्या 

कळकळीची साथ लाभो


वारसा उचलून त्यांचा

सावरू अन प्राण सांडू

बळावून हिम्मत घडीला

शस्त्र दुधारी हात लागो

चळवळींना श्वास देण्या 

कळकळीची साथ लाभो


चालती पाऊले जिद्दी

 ठाम स्वप्ने वसली 

मिळे कर्माने सारे

परीकाही ईशास सांगु

चळवळींना श्वास देण्या 

कळकळीची साथ लाभो


प्रेम राही जिथे 

नांदते शुभाची स्पंदने

पैलतीर इथे पाहण्या

जीवनी कैवल्य आणू

चळवळींना श्वास देण्या 

कळकळीची साथ लाभो


            ©️ ✍🏻प्रफुल्ल भोयर



18 February 2025

जवळा येथे 2 मार्च रोजी शासकिय योजनांचा महामेळावा....

 जवळा येथे 2 मार्च रोजी शासकिय योजनांचा महामेळावा



मेळावा तयारीचा आढावा

यवतमाळ, दि. 18 (जिमाका) :  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळच्यावतीने आर्णी तालुक्यातील जवळा येथे शासकिय सेवा व योजनांचा महामेळावा आयोजिन करण्यात आला आहे. मेळाव्याच्या अनुषंगाने जिल्हा न्यायालायात आढावा घेण्यात आला.

                बैठकीला यवतमाळ व आर्णी येथील सर्व शासकिय कार्यालयातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय योजनांची माहिती व्हावी, त्यांना लाभ घेता यावा यासाठी मेळावा घेण्यात येत आहे. विविध शासकिय कार्यालयामार्फत सामान्य जनतेस मिळणाऱ्या शासकिय योजनेची प्रत्यक्ष अमंलबजावणी करून घेवून त्यांना त्यांचा प्रत्यक्ष लाभ मिळुन देण्याबाबत उपस्थित सर्व कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले.

                सदर शिबीरांतर्गत तहसिल कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, त्यात उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, नॉन क्रिमिलिअर तसेच अधिवास व सातबारा इत्यादी तसेच पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना जसे घरकुल योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रम, समाजकल्याण मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, कामगार विभाग, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व विविध शासकीय योजनांची अमंलबजावणी सदर महामेळाव्याच्या ठिकाणी होणार आहे.

                जास्तीत जास्त नागरीकांनी रविवार दि. 2 मार्च रोजी श्री. गुरूदेव विद्या मंदीर व कनिष्ठ महाविद्यालय मौजा जवळा, ता. आर्णी, येथे होणाऱ्या सदर शासकिय सेवा व योजनांचा महामेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल नहार यांनी केले आहे.


17 February 2025

संविधान महोत्सवांतर्गत मोफत कायदेविषयक शिबीर....

स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ चे विद्यार्थी...

संविधान महोत्सवांतर्गत मोफत कायदेविषयक शिबीर....

यवतमाळ :- स्वातंत्र्य सेनानी  जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ येथे सध्या संविधानाला यशस्वी पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 'संविधान महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे, त्याअंतर्गत चर्चासत्र, प्रश्नमंजूषा, निबंध स्पर्धा, मुलभूत कर्तव्य यावर चर्चासत्र, व्याख्यान, संविधान प्रास्तविक वाचन व सम्मान शपथ ईत्यादी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
         संविधानाने मोफत विधी सेवा मिळण्याचा अधिकार नागरिकांना बहाल केला आहे त्या बद्दल जनजागृती करणे तसेच मोफत सहाय्य व सल्ला देण्यासाठी महाविद्यालयातर्फे शिबीराचे आयोजन सावरगड येथे करण्यात आले होते.

        सदर कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर मा. कुणाल नाहर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विजेश मुणोत, महाविद्यालयाच्या विधी सेवा चिकित्सालयाचे प्रभारी डॉ. संदीप नगराळे, अॕडव्होकेट विजया घाडगे, अॕडव्होकेट सोनाली भोयर, प्रा. अंजली दिवाकर, सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विक्रांत जाधव, सरपंच सौ. ईंदीरा दोनोडे, श्री. काजी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ई. मंचावर उपस्थित होते.

         यावेळी प्रमुख मार्गदर्शक न्यायाधीश कुणाल नाहर यांनी मोफत कायदेविषयक  सांविधानीक तरतुदींची माहिती दिली. त्याचप्रमाणे विधी सेवा अधिनियम अंतर्गत मोफत लाभ घेण्यास पात्र व्यक्तींची माहिती दिली. आपल्या लोकशाहीत पैसे नाही म्हणून कुणासही न्याय नाकारता येत नाही, तर शासन अशा व्यक्तींची फिस  भरते. त्यामुळे गरजूंनी लाभ घ्यावा त्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तत्पर आहे, असे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले.
 
         अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ. विजेश मुणोत यांनी मोफत कायदेविषयक सेवेच्या अनुषंगाने सांविधानीक तरतूदी, न्यायनिवाडे यांचा दाखला देत महाविद्यालच्या मोफत कायदेविषयक सेवा चिकित्सालयाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी ईतर अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले .

मोफत विधी सेवा शिबिर कार्यक्रमाचे प्रास्तविक व आभार डॉ. विक्रांत जाधव यांनी केले. शिबिराला ग्रामस्थ, समाजकार्य महाविद्यालय व विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. यावेळी अनेकांनी त्यांच्या समस्या मांडल्या त्यावर निराकरणासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

प्राचार्य डॉ. मुनोत सर

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव नहार सर

 




15 February 2025

समाज सुरक्षित बनवण्यासाठी पोलिसांच्या कर्तव्याचा आदर करा....

समाज सुरक्षित बनविण्यासाठी पोलिसांच्या कर्तव्याचा आदर करा


◆ विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शहर पोलीस स्टेशन ला शैक्षणिक भेट

यवतमाळ:- समाजात कायदा आणि सुव्यवस्था, हे पोलिसांचे राखण प्राथमिक कर्तव्य आहे. कायदे सत्य आणण्यासाठी पोलिसांची भूमिका अधिक महत्त्वाची असते. लोकांच्या सामाजिक जीवनावर नियंत्रण ठेवणारे कायदे अधिकारावर नियंत्रण ठेवणारे आहेत याची खात्री पटत नाही. आपल्या देशात पोलिसांचे विभाग आहेत, त्यासोबत त्यांची भूमिकाही आहे. नागरिकांच्या हक्कांवर बंधने अनिवार्य असू नयेत, नागरिकांच्या हक्कासाठी बाधा असणे आवश्यक आहे यासाठी पोलिस २४ तास धडपडत असतात. आपण पोलिसांविना समाजाची कल्पना करू शकत नाही. लोकांचा समुदाय कमी करणे, लोकांचे समुदाय संरक्षण करणे आणि कायदा मोडला शिक्षण देणे. या भूमिकेतील पोलीस अधिकारी जाणून घेणारे तसेच शैक्षणिक संस्थांर्गत प्रातिनिधीकपणे लढण्यासाठी सेना जवाहरलाल डार्डा कॉलेज ऑफ लॉवतमाळ पोलीस स्टेशन यवतमाळ येथे शैक्षणिक भेट दिली.           
          पोलिसांची शहानिशा करणे आवश्यक आहे. न्यायमूर्ती न्यायमूर्ति गुन्ह्यांचा आणि संशयित पोलिस पोलिस करतात. अशी विस्तृत माहिती विस्तृत. पोलीस स्टेशनमध्ये सर्व विभागीय कामकाजाची माहिती पोलीस निरीक्षक आणि इतर पोलीस अधिकारी उपनिरीक्षक स्वप्नील कावरे, संजय आत्राम, गजानन आदींनी विधीक्षकांच्या प्रत्येक कामाची माहिती दिली. प्राचार्य डॉ. विजेश मुनोत यांच्या मार्गदर्शनात डॉ. संदीप नगराळे प्रा. अंजली दिवाकर, प्रा. मृणाल कटोलकर यांनी सदर अभ्यासभेट घडवून आणली.
शहर पोलीस स्टेशन यवतमाळ



नागराळे सर आणि पीएसआय स्वप्नील कवरे सर यांच्यासोबत 










मराठी भाषेची संघर्ष ज्योत मनात पेटत ठेवा - डॉ. किशोर बुटले

◆ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लाॅ मध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा यवतमाळ – स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा लॉ कॉले...