"आज ९ ऑगस्ट २०२२ ऑगस्ट क्रांती दिन विशेष लेख"
एक भारत श्रेष्ठ भारत
नमस्कार मंडळी ! कसे आहात सर्वजण ! सगळं ठीक चाललंय ना ? काय म्हणता ? उद्या ९ तारीख, ऑगस्ट क्रांती दिन नाही का? हो ना. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणुन ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
भारत मातेच्या स्वातंत्र्याची गाथा काही निराळीच आहे. इतिहास बघितला तर जाणवते की, आज आपण जी सुखाने चैनीची झोप घेतो ती त्याच थोर क्रांतिकारक महात्म्यांमुळे. ज्यांनी आपलं अख्य आयुष्य देशासाठी अर्पण करुन प्राणाची आहुती दिली व भारताचं स्वातंत्र्य मिळवलं. कणखर, शक्तिशाली, बुद्धिमान, आत्मविश्वासू अशा असंख्य व्यक्तिमत्वांचा वारसा मिळालेला माझा भारत देश खरंच खूप महान आहे.
ऑगस्ट क्रांती दिन हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक सोनेरी पर्व. या दिवशी स्वातंत्र्याच विजयबिगुल ठरलं. “वंदेमातरम" च्या घोषणा देत तिरंगा फडकवला गेला आणि नवा इतिहास घडला. स्वातंत्र्यासाठी आतूर झालेल्या भारतीय जनतेने ब्रिटिश सत्तेविरुद्ध जणू उठावच केला होता. स्वातंत्र्यसैनिकांनी भोगलेल्या हालअपेष्टा, त्यांनी दिलेले योगदान आणि बलिदान आजही स्फूर्तिदायकच ठरते. ही भारताला श्रेष्ठत्वाकडे नेणारी महत्वाची वाटचाल होती.
भारत हा एक विकसनशील देश आहे, या देशात खेड्यांची संख्या जास्त आहे. पुरातन काळापासून देशाला सण-उत्सव साजरे करण्याची संस्कृती परंपरेने चालत आली आहे. सुजलाम सुफलाम असलेला माझा भारत देश विविधतेने नटलेला आहे म्हणजे आपल्या देशाच्या निरनिराळ्या प्रांतात राहणीमान, बोलीभाषा, नृत्यप्रकार आणि पोशाख ही निरनिराळेचं. या देशात सर्व धर्म पंथाचे लोक समता व बंधुभाव जोपासून गुण्या गोविंदाने राहतात. त्यांच्या वागण्या बोलण्यात ममत्व, जिव्हाळा, आपुलकी आजही टिकून आहे. नात्यात पवित्रता आहे. वडीलधाऱ्यांचा आदर करणे हे कर्तव्य समजतात. माझ्या या देशात रडणाऱ्यांच्या मुखावर अलगद हसू उमटविण्याचे पवित्र काम मोठ्या प्रेमाने केले जाते.
जगाच्या पाठीवर अशा या एकमेव देशात अचाट महत्वाकांक्षा व बुद्धीमत्तेच्या जोरावर विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे. ती आज सर्वच क्षेत्रात पसरलेली दिसत आहे. समाजात घडणाऱ्या अनिष्ट चालीरीती, परंपरांना मागे टाकून समाज सुधारण्यात मोठे यश प्राप्त झाले आहे. अंधश्रद्धा, बालविवाह इत्यादी सामाजिक समस्यांचे समाजातून निर्मूलन होत आहे. लोकांच्या भावभावना व दृष्टिकोनात कमालीचा सकारात्मक बदल दिसून येत आहे. याचा परिणाम समाजात आज महिलांची झालेली उन्नती. चुल-मूल च्या चक्रव्यूहातुन बाहेर पडून त्या स्वतःच्या करियरला अधिक महत्व देऊ लागल्या. अशी ही महिलांची प्रगती देश बांधणीसाठी महत्वपूर्ण ठरते. देशातील शिक्षण क्षेत्राच्या वाढत्या व्यापकतेमुळे साक्षरतेचे प्रमाण उंचावण्यास मदत झाली. शिक्षणाने खुप मोठी प्रगती केली आहे.
माझ्या देशात एखाद्याने केलेल्या शौर्याच्या करामतीची गोष्ट ऐकली की गर्वाने छाती फुगून येते राजेहो! भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतीवर आधारित छोटे-मोठे उद्योग येथे चालतात. विपुल नैसर्गिक संसाधनाच्या वापराने देशाच्या विकासात भर पडत आहे. नदी नाल्यांनी आच्छादलेल्या, हिरवा शालू पांघरूण सुंदरतेने नटलेल्या माझ्या या मायभूमीतील निसर्गाची देणं, हा अमूल्य ठेवा आहे. पूर्वापार चालत आलेली साहित्यातील प्रतिभाशाली लिखाणाची परंपरा समाजाच्या उत्कर्षाचे प्रतिक समजले जाते.
आपल्या भारत देशाची उत्कर्षाकडे होणारी वाटचाल श्रेष्ठ ठरत आहे. म्हणूनच भारत देश खुप महान आहे.
जय हिंद...
शब्दांकन :- प्रफुल भोयर / ७०५७५८६४६८
No comments:
Post a Comment