साजरा करु उत्सव रक्तदानाचा
१ ऑक्टोबर
◆ स्वैच्छिक रक्तदान दिवस
भारतीय समाजात सण उत्सव साजरे करण्याचा प्रघात पूर्वापार चालत आहे. आपली संस्कृती अबाधित राखण्यासाठी सण- उत्सव साजरे करणे खुप महत्त्वपूर्ण ठरते. त्या काळात निराशेच्या दलदलीतून बाहेर येत वेगळाच उत्साह मनात भरतो. तो उत्साह आपल्या जगण्याचा आनंद द्विगुणित करीत असतो. वेगवेगळ्या भागात उत्सव साजरे करण्यात कमालीची विविधता दिसून येते. प्रत्येक भागात सण साजरे करण्याची तऱ्हाही निराळीच.
आज 1 ऑक्टोबरला स्वैच्छिक रक्तदान दिन साजरा करण्यात येतो. रक्तदान श्रेष्ठदान या म्हणीप्रमाणे मानवी जीवनात रक्त हा विशेष महत्वपूर्ण घटक आहे. मानवाला जिवंत राहण्यासाठी शरीराची रक्ताची पातळी योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे. रक्ताचे प्रमाण कमी असणाऱ्या शरीरात जसे थँलेसिमीया, सिकलसेल, ऍनिमिया सारख्या रुग्णांना जिवंत राहण्यासाठी नियमित रक्ताची गरज असते. अश्यांना जिवंत ठेवण्यासाठी सुदृढ युवकांनी नियमित स्वैच्छिक रक्तदान करणे महत्वाचे आहे.
मानवी शरीरात रक्ताच्या कमतरतेसाठी विविध कारणे असू शकतात. मानवाला विविध कारणासाठी रक्ताची आकस्मित गरज भासू शकते. ती तात्काळ पूर्ण व्हावी म्हणजे यासाठी रक्तदान करणारा दाता हवा. सुदृढ शरीराचा व्यक्ती मानसिकतेने रक्तदानास तयार नसेल तर आकस्मित येणाऱ्या रक्त पुरवण्याच्या समस्येवर तोडगा काढणे कठीण जाते. पण काहीच तरुण लोक सुदृढ शरीरयष्टी सोबत मनाने रक्तदानास तयार असते. अश्यांमुळे कोणाला तरी जीवनदान मिळेल हे निश्चित आहे.
आजच्या घडीला जीवनमानाच्या बदलामुळे अनेक रुग्णांना तातडीची गरज भासते. अँनिमिया, थँलिसीमिया, सिकलसेल या आजाराच्या रुग्णाला नियमित रक्ताची गरज असते. बाळंतपणासाठी आलेल्या मातांना त्या काळात रक्ताची गरज भासु शकते. मोठमोठ्या शस्त्रक्रिया करताना वा अपघात ग्रस्तांना वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यास गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. अश्या कठीण वेळात रक्तदाता बनुन जीव वाचविण्यास मदत करणारा नक्कीच श्रेष्ठ ठरतो. म्हणूनच तर म्हंटले आहे, "रक्तदानासारखे श्रेष्ठदान" कुठले असू शकते.
भविष्यातही एखाद्याला रक्ताची तातडीची गरज असेल, सुदृढ रक्तदानास पात्र असणाऱ्यांची संख्याही अगणित असेल पण मनाने तो रक्तदानाने तयार नसेल तर त्यास आपण सामाजिक बांधिलकी जपणारा तरुण असे म्हणू शकेल काय ?
समाजात राहताना इतरांशी होणारा व्यवहार हा सौहार्दपूर्ण, आपुलकीचा, सामाजिक बांधिलकीचा असणे फार गरजेचे आहे.
आनंदाचे क्षण कमी
दुःखची आभाळाएवढे ।
जीवन त्याचेच नाव ना
अनुभव सागरा एवढे ।।
सामाजिक भान जपत केलेल्या जीवनाचा प्रवास आपणास आलेल्या अनुभवातून शिकण्याची संधी देते. चुका सुधारण्यासाठी वाट दाखवते. म्हणून मानवतेसाठी रक्तदान करणे हा आपल्या जीवनातील अविभाज्य घटक म्हणून पाहणे गरजेचे आहे. हा आपल्या व रुग्ण जिवाच्या कल्याणाचा निर्णय ठरु शकतो.
१ ऑक्टोबरला साजरा होणारा स्वैच्छिक रक्तदान दिन हा एक सामाजिक उत्सव म्हणून साजरा झाला पाहिजे. घराघरात एक तरी रक्तदाता तयार झाला पाहिजे. रक्तदानासाठी युवकांनी मानसिकता तयार करणे गरजेचे आहे. रक्तदानाचं महत्त्व जाणुन स्वयंप्रेरणेने रक्तदानास पुढे येणे गरजेचे आहे. यामुळे कोणाचा तरी जीव वाचेल आणि जीवनदान मिळेल. पर्यायाने आपल्याला आत्मिक समाधान मिळेल.
"दान करु रक्ताचे
ऋण फेडू समाजाचे"
शब्दांकन:- प्रफुल भोयर
यवतमाळ
७०५७५८६४६८
No comments:
Post a Comment