16 August 2022

प्रिय प्रफुल...

 प्रिय प्रफुल 


रुग्णाच्या आयुष्यात 

इंद्रधनुचे रंग भरतो 

असा चित्रकार तू,

दीनांचे दुःख 

कागदावर मांडतो

असा पत्रकार तू, 

संवेदनशील रक्तदानाचा

जगात प्रसार करतो

असा प्रचारक तू,

इतरांस स्वताप्रमाणे पाहतो

असा विचारक तू,

शब्दाच्या गुंफनात

स्नेह विणतो

असा थोर कवी,

मदतगार ठरतो आहे

पिढी घडवण्यास भावी,

संकटात तारूप्रमाणे

मला वाटतोस तू......

असाच झोकून दे

निरपेक्ष पणे स्वतःला

कार्यकुशलतेने वाग

अनेकांना सुखवायचय तुला

आशिष आईचा आहे

सदैव तुझ्या शिरावर,

कर्तव्यही तेवढेच

भार वाढेल डोक्यावर

पण

 तू माणूस चांगला घडावा

ती जगते याच आशेवर

जे संस्काराचे बीज पेरले

वर्षानुवर्षे

तिचे फळ मिळो

अति मधुर सर्वास प्रिय

थांबू नकोस कधी

आले ठेच, काच, काटे, थडगे...

तुझ्यावर निर्भर आहे

कित्येक मूल्याचे रुजणे

हास्य फुलव मुखी

अनेकांचे सुंदर कर जगणे।।

           रचना :-कु. प्रणिता भोयर

15 August 2022

"विश्वात्मक औदार्य - रक्तपेढी एक वरदान"


 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त.....

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

सन्माननीय अधिष्ठाता श्री. मिलिंद फुलपाटील साहेब 

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ

                   यांच्या शुभ हस्ते

प्रफुल्ल भोयर लिखित "विश्वात्मक औदार्य - रक्तपेढी एक वरदान" पुस्तकाचे थाटात प्रकाशन


प्रमुख उपस्थिती अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार, प्रशासकीय अधिकारी श्री. झिंजे, रक्तपेढी विभागाचे वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक श्री. आशिष खडसे तसेच शासकीय रुग्णालयाचे सर्व विभाग प्रमुख, अधिकारी तथा कर्मचारी वृंद.

श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ( रक्तपेढी) यवतमाळ यांची गौरवगाथा जाणून घेण्यासाठी एकदा अवश्य वाचा...

"विश्वात्मक औदार्य"

      रक्तदानाची महती वर्णावी तेवढी कमीच आहे. आजच्या घडीला मानवी मूल्य कशी जोपासावी कुणालाही समजवावे लागत नाही. जीवाच महत्व समजावून सांगणारे दान अशी ज्याची ओळख आहे ते म्हणजे रक्तदान.मानवी मूल्याच्या जोपासने बरोबरच आचरणात आणण्यासाठी रक्तदान मानवी जीवनात कशी भूमिका बजावते, रक्तदानाचे शारीरिक फायदे, मनावर होणारा सकारात्मक बदल, एकंदरीत संपूर्ण मानवतेला दानाची संस्कृती आणि परंपरा जपायला शिकवणारे पुस्तक, नाते जपायला लावणारे, माणुसकीने हृदयाला पाझर फोडणारे, निरपेक्ष भावनेने मदतीचा हात द्यायला सांगणारे पुस्तक विश्वात्मक औदार्य.



स्थळ :- श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ

दिनांक :- 15/08/2022










14 August 2022

रक्तविर रक्ताचे नाते मजबूत बनवते.....

 रुग्णाला जगण्याचा रंग पाहू द्या  ! 

आवश्यक वेळी रक्तदाता होऊ या !!


रक्तविर रक्ताचे नाते मजबूत बनवते

     रक्तदानाची महती वर्णावी तेवढी कमीच आहे. आजच्या घडीला मानवी मूल्य कशी जोपासावी कुणालाही समजवावे लागत नाही. जीवाचे महत्व समजावून सांगणारे दान अशी ज्याची ओळख आहे ते म्हणजे रक्तदान.

     रक्तविर बहुउद्देशीय संस्था ही यवतमाळ जिल्ह्यातील झरी या दुर्गम तालुक्यातील मुकुटबन येथील युवकांनी सुरु केलेली एक रक्तदानाची दिव्य चळवळ आहे. जी धाग्याप्रमाणे माणसं जोडतात आणि नातं घट्ट करतात. महत्वाचे म्हणजे आपत्ती वेळी रक्ताविना जीव जाणाऱ्या रुग्णाचे प्राण वाचवितात. रुग्णाच्या मनात आयुष्याची नवी उमेद जागी करुन रक्तविर रुग्णाला जगण्याचा रंग दाखवते.

     गरजूंना जीवनदान देण्याच्या मुख्य हेतूने पेटविलेल्या दिव्य कुंडात आज लाखोंनी सहभाग नोंदविला आहे. दररोज लागणाऱ्या रक्ताची गरज रक्तविर आपल्या परीने रक्त देऊन रुग्णासाठी जीवनदाता ठरत आहे.

     रक्तदानाला सर्वश्रेष्ठ दान म्हणतात कारण रक्तदानाला  कुठलाही पर्याय उपलब्ध झाला नाही. याचे भान सर्वानीच ठेवायला हवे. रक्तासाठी माणुस इतर माणसांवर अवलंबून आहे म्हणून रक्तदान करणे महत्वाचे आहे. त्यासाठी समाजात सर्वव्यापी रक्तदानाची जनजागृती व्हावी, या हेतूचा झेंडा घेऊन निघणारी रक्तविरची जनजागृती लाखो युवकांना रक्तदाते बनवत आहे. 

    समाजासाठी काहीतरी करावं अशी अनेकांची इच्छा असते. पण त्यांच्यातले काहीजण मात्र खरोखरच उभे राहतात आणि आपल्याला महत्वाच्या वाटणाऱ्या एखाद्या कामासाठी झोकून देतात. लौकिक अर्थाने त्यांचं काम फार मोठं नसेलही कदाचित पण समाज पुढे जाण्याच्या प्रक्रियेत तो खारीचा वाटा खुप महत्वाचा असतो. अशा प्रत्येक सेवाव्रतींना रक्तविर बहुउद्देशीय संस्था मानाचा मुजरा अर्पण करते. 

     पैसे सारेच कमवतात मात्र त्यातून समाधान कुणाला किती मिळते. हा संशोधनाचा विषय ठरतो. म्हणून आपण केवळ पैसाच नव्हे, तर समाधान मिळवण्यासाठी जगायला पाहिजे. आणि याच जगण्यात कायम मोकळेपण असतो. अशांना रक्तविर सदैव सलाम करत आले आहेत.

        रक्तवीर बहुद्देशीय संस्थेच्या प्रफुल भोयर यांच्या कार्याला व त्यांच्या स्वयंलिखित रक्तदान जनजागृती विषयक लिहिलेल्या "विश्वात्मक औदार्य रक्तपेढी एक वरदान" या श्री वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढी यवतमाळ यांच्या कार्याची गौरवगाथा तसेच जनजागृतीपर असलेल्या पुस्तकाला प्रफुल यांनी महाराष्ट्र समृद्ध व संपन्न करण्यासाठी कटीबद्ध असलेल्या सर्व सजग व सुजाण नागरिकांना समर्पित केले आहे.   

      भगत सिंह कोश्यारी( राज्यपाल महाराष्ट्र राज्य ), मा. बच्चूभाऊ कडू राज्यमंत्री, राज्य रक्त संक्रमण परिषद मुंबई चे सहाय्यक संचालक डॉ. अरुण थोरात, माननीय आमदार मदन येरावार, कालिंदाताई पवार, तसेच जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, तहसीलदार कुणाल झाल्टे, पोलीस कल्याण शाखेचे पी. व्ही. फाडे, जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम, नितीन मिर्झापुरे, बिपीन चौधरी तसेच प्रत्यक्ष रक्तदात्यांच्या शुभेच्छा सह रक्तवीरांच्या कार्याला सर्वांचा पाठिंबा आहे. 

          प्रफुल भोयर यांनी रक्तवीरांच्या जनजागृतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. आज रोजच्या लागणाऱ्या रक्ताची गरज पाहता शेकडोच्या संख्येने रक्तदाते तयार ठेवावे लागते, असे प्रफुल भोयर सांगतो.

          अनेक पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रफुल भोयर यांच्याकडे असलेल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर ते व्यापक जनजागृती मोहीम राबवित आहे.

        स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त रक्तविर बहुद्देशीय संस्थेच्या प्रफुल भोयर यांनी देशातील रक्तदात्यांना रक्तदानासाठी आवाहन केले आहे. समाजसेवा ही अविरत चालू राहणारी घटना आहे. आपल्या देशाप्रती असलेला सेवाभाव, स्वातंत्र्य चळवळीत हुतात्मा झालेले क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन आणि स्वातंत्र्याचा जागर करण्यासाठी एकदा अवश्य रक्तदान करावे. देशाप्रती असलेली आत्मीयता, देशप्रेमाची भावना जागृत करून अंमलात आणण्याचे एक माध्यम म्हणून रक्तदानाकडे पाहूया, असे यावेळी प्रफुल भोयर म्हणाले. रक्तदाते वाढीस लागणे हेच खरे प्रफुल भोयर यांच्या कार्याचे यश आहे.

08 August 2022

एक भारत श्रेष्ठ भारत...

"आज ९ ऑगस्ट २०२२ ऑगस्ट क्रांती दिन विशेष लेख"

 एक भारत श्रेष्ठ भारत

           नमस्कार मंडळी ! कसे आहात सर्वजण ! सगळं ठीक चाललंय ना ? काय म्हणता ? उद्या ९ तारीख, ऑगस्ट क्रांती दिन नाही का? हो ना. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणुन ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.

     भारत मातेच्या स्वातंत्र्याची गाथा काही निराळीच आहे. इतिहास बघितला तर जाणवते की, आज आपण जी सुखाने चैनीची झोप घेतो ती त्याच थोर क्रांतिकारक महात्म्यांमुळे. ज्यांनी आपलं अख्य आयुष्य देशासाठी अर्पण करुन प्राणाची आहुती दिली व भारताचं स्वातंत्र्य मिळवलं. कणखर, शक्तिशाली, बुद्धिमान, आत्मविश्वासू अशा असंख्य व्यक्तिमत्वांचा वारसा मिळालेला माझा भारत देश खरंच खूप महान आहे.

          ऑगस्ट क्रांती दिन हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक सोनेरी पर्व. या दिवशी स्वातंत्र्याच विजयबिगुल ठरलं. “वंदेमातरम" च्या घोषणा देत तिरंगा फडकवला गेला आणि नवा इतिहास घडला. स्वातंत्र्यासाठी आतूर झालेल्या भारतीय जनतेने ब्रिटिश सत्तेविरुद्ध जणू उठावच केला होता. स्वातंत्र्यसैनिकांनी भोगलेल्या हालअपेष्टा, त्यांनी दिलेले योगदान आणि बलिदान आजही स्फूर्तिदायकच ठरते. ही भारताला श्रेष्ठत्वाकडे नेणारी महत्वाची वाटचाल होती. 

       भारत हा एक विकसनशील देश आहे, या देशात खेड्यांची संख्या जास्त आहे. पुरातन काळापासून देशाला सण-उत्सव साजरे करण्याची संस्कृती परंपरेने चालत आली आहे. सुजलाम सुफलाम असलेला माझा भारत देश विविधतेने नटलेला आहे म्हणजे आपल्या देशाच्या निरनिराळ्या प्रांतात राहणीमान, बोलीभाषा, नृत्यप्रकार आणि पोशाख ही निरनिराळेचं. या देशात सर्व धर्म पंथाचे लोक समता व बंधुभाव जोपासून गुण्या गोविंदाने राहतात. त्यांच्या वागण्या बोलण्यात ममत्व, जिव्हाळा, आपुलकी आजही टिकून आहे. नात्यात पवित्रता आहे. वडीलधाऱ्यांचा आदर करणे हे कर्तव्य समजतात. माझ्या या देशात रडणाऱ्यांच्या मुखावर अलगद हसू उमटविण्याचे पवित्र काम मोठ्या प्रेमाने केले जाते. 

     जगाच्या पाठीवर अशा या एकमेव देशात अचाट महत्वाकांक्षा व बुद्धीमत्तेच्या जोरावर विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे. ती आज सर्वच क्षेत्रात पसरलेली दिसत आहे. समाजात घडणाऱ्या अनिष्ट  चालीरीती, परंपरांना मागे टाकून समाज सुधारण्यात मोठे यश प्राप्त झाले आहे. अंधश्रद्धा, बालविवाह इत्यादी सामाजिक समस्यांचे समाजातून निर्मूलन होत आहे. लोकांच्या भावभावना व दृष्टिकोनात कमालीचा सकारात्मक बदल दिसून येत आहे. याचा परिणाम समाजात आज महिलांची झालेली उन्नती. चुल-मूल च्या चक्रव्यूहातुन बाहेर पडून त्या स्वतःच्या करियरला अधिक महत्व देऊ लागल्या. अशी ही महिलांची प्रगती देश बांधणीसाठी महत्वपूर्ण ठरते. देशातील शिक्षण क्षेत्राच्या वाढत्या व्यापकतेमुळे साक्षरतेचे प्रमाण उंचावण्यास मदत झाली. शिक्षणाने खुप मोठी प्रगती केली आहे. 

     माझ्या देशात एखाद्याने केलेल्या शौर्याच्या करामतीची गोष्ट ऐकली की गर्वाने छाती फुगून येते राजेहो! भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतीवर आधारित छोटे-मोठे उद्योग येथे चालतात. विपुल नैसर्गिक संसाधनाच्या वापराने देशाच्या विकासात भर पडत आहे. नदी नाल्यांनी आच्छादलेल्या, हिरवा शालू पांघरूण सुंदरतेने नटलेल्या माझ्या या मायभूमीतील निसर्गाची देणं, हा अमूल्य ठेवा आहे. पूर्वापार चालत आलेली साहित्यातील प्रतिभाशाली लिखाणाची परंपरा समाजाच्या उत्कर्षाचे प्रतिक समजले जाते.

    आपल्या भारत देशाची उत्कर्षाकडे होणारी वाटचाल श्रेष्ठ ठरत आहे. म्हणूनच भारत देश खुप महान आहे. 

जय हिंद...

शब्दांकन :- प्रफुल भोयर / ७०५७५८६४६८




कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...