दि.1 June, 2021
विश्वात्मक औदार्य- मानवतेसाठी दातृत्वाची दिव्य चळवळ
जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्ताने.....🩸
औक्षवंत हो !
कुटुंबसंस्था ही घरातील सर्व सदस्यांच्या आधारावर चालते. रक्ताच्या नात्यात गुंफलेले, प्रेमाच्या धाग्याने एकमेकांना बांधलेले असतात. घरात एका व्यक्तीच्या कमतरतेमुळे संपूर्ण कुटुंबाची घडी विस्कटली जाते. घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या जाण्याने कित्येकांचे आयुष्य उद्ध्वस्त होतात. कुटुंबसंस्था कमकुवत बनते, हास्य लोप पावते. पण रक्तामुळे होणारी प्राणहानी आपण नक्कीच रोखू शकतो. तेही आपल्या रक्तदानाने. तरुणांच्या रक्तदानामुळे अनेकांची रक्ताची गरज पूर्ण होऊ शकते व कुटुंबाची होणारी हानी नक्कीच रोखल्या जाते. यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावातून तरुणांनी व्यापकतेची कास धरायला पाहिजे. रक्तदानाचे महत्त्व स्वतःच्या मनाला पटवून दिल्यास रक्तदात्यासाठी भटकंतीची गरजच संपेल आणि घरातलीच व्यक्ती रक्तदान करू शकेल. आपल्यामुळे आपल्या माणसाचा जीव वाचल्याने अभिमानाने आईच्या मुखातून उद्गार येईल, औक्षवंत हो! बाळा. तोच खरा परमेश्वरीय आशीर्वाद असेल. 'तरुणांनो जागृत व्हा नियमित रक्तदान करा'.
#जोश तरुणाईचा 💫
इच्छेपुढे तरुणाईच्या
झाले आकाश ठेंगणे।।
यशोशिखरावर चढूनी
फिटे सद्भावाचे पारणे।।
मूठ एकवटून जेव्हा
जागृतीने तो गर्जला।।
सर्वत्र यश मिळवून
चांदणे तोडण्या सरसावला।।
अगम्य आकांक्षा उरी
नवतेज ते आत्म्यांतरी।।
मातीत रुजली परिश्रमाची
गोड-प्रांजळ मंजिरी।।
ध्येय रुपी अर्णवातून
गटांगळत न्हाला।।
अन्यायाला विरोध करण्या
पुढे धजावला।।
क्षण आयुष्याचा
सिद्धी पावण्या आला।।
जोश तरुणाईचा
मला सांगूनी गेला।।
शब्दांकन:-प्रफुल भोयर
🩸🩸🩸🩸🩸🩸🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
No comments:
Post a Comment