माजी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांचे १५ नोव्हेंबर रोजी यवतमाळ येथे विशेष व्याख्यान...

*माजी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांचे   १५ नोव्हेंबर रोजी यवतमाळ येथे विशेष व्याख्यान


यवतमाळ : सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश डॉ. धनंजय यशवंत चंद्रचूड हे १५ नोव्हेंबर रोजी यवतमाळकरांशी संवाद साधणार आहेत. विद्या प्रसारक मंडळ संचालित स्वतंत्रता सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ यांच्या वतीने आयोजित ‘स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा स्मृती व्याख्यानमाले’त त्यांचे ‘कायदा आणि न्यायशास्त्र’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. रविवारी सायंकाळी ५ वाजता येथील गोधनी रोडवरील अमोलकचंद महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल.

या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. उच्च शिक्षण विभागाचे प्रभारी संचालक डॉ. शैलेंद्र देवलनकर आणि यवतमाळचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल. यावलकर यांचीही प्रमुख उपस्थिती राहील. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा लोकमत मीडिया समूहाचे चेअरमन, माजी खासदार डॉ. विजय दर्डा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

कायदा, न्यायव्यवस्था, न्यायशास्त्र तसेच बदलत्या सामाजिक परिस्थितीत न्यायसंस्थेची भूमिका या विषयांवर डॉ. चंद्रचूड यांच्या व्याख्यानातून विचारमंथन होणार आहे. या व्याख्यानाला उपस्थित राहण्याचे आवाहन विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. प्रवीण जानी, सचिव सीए प्रकाश चोपडा, उपाध्यक्ष डॉ. ललित निमोदिया आणि विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजेश मुनोत यांनी केले आहे.


*विद्यार्थ्यांसह कायद्याच्या अभ्यासकांसाठी पर्वणी



डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून नोव्हेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत जबाबदारी सांभाळली. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुखपदी दोन वर्षे कार्यरत राहिलेल्या माजी सरन्यायाधीशांचे विचार प्रत्यक्ष ऐकण्याची संधी यवतमाळच्या विधी क्षेत्राला मिळणार आहे. विधी शाखेचे विद्यार्थी, प्राध्यापक, वकील, न्यायव्यवस्थेशी संबंधित व्यक्ती आणि अभ्यासकांसाठी हा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.


*न्यायक्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाची परंपरा*

स्वतंत्रता सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ यांच्या वतीने कायदा आणि न्यायव्यवस्थेच्या विविध पैलूंवर चर्चासत्रे, परिसंवाद आणि व्याख्यानांच्या माध्यमातून वैचारिक संवाद घडवून आणला जातो. या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांच्या सहभागाची मोठी परंपरा लाभली आहे.

२८ ते ३० सप्टेंबर २००३ या कालावधीत ‘मानवाधिकारी व मूलभूत कर्तव्य शिक्षण’ या विषयावर सेमिनार झाला. याचे उद्‌घाटन माजी उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांच्या हस्ते झाले होते. या तीन दिवसीय सेमिनारला प्रसिद्ध विधिज्ञ व माजी केंद्रीय मंत्री ॲड. कपिल सिब्बल, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह, ऑल इंडिया ॲंटी टेररिस्ट फ्रन्टचे अध्यक्ष मनिंदरसिंह बिट्टा यांची प्रमुख उपस्थिती होती. 

१५ जून २००७ रोजी तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम, मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी महाविद्यालयाला भेट देऊन मार्गदर्शन केले. २५ व २६ डिसेंबर २००८ रोजी महाविद्यालयात ‘जस्टिस फॉर वुमन’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील परिषद झाली. तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीने या परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. राज्यपाल एस.सी. जमीर, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती स्वतंत्र कुमार आणि न्या. व्ही. एस. सिरपूरकर यांनी मार्गदर्शन केले होते.  

२००९ मध्ये झालेल्या परिसंवादाचे उद्घाटन कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री तथा तत्कालीन केंद्रीय कायदा व न्यायमंत्री वीरप्पा मोईली यांच्या हस्ते झाले होते. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी मार्गदर्शन केले होते.

२०११ मध्ये ओडिशाचे तत्कालीन राज्यपाल मुरलीधर भंडारे चर्चासत्राला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. २०१३ मध्ये माजी केंद्रीय कायदामंत्री आणि राज्यसभा सदस्य राम जेठमलानी यांनी मार्गदर्शन केले. बिहारचे तत्कालीन राज्यपाल पद्मश्री डी. वाय. पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती. त्याच वर्षी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष न्या. मार्कंडेय काटजू यांनी ‘न्यायशास्त्र आणि न्यायिक सक्रियता’ या विषयावर विचार मांडले होते.

२०१६ मध्ये ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या उपस्थितीत चर्चासत्र झाले. २ मे २०२६ रोजी भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण महाविद्यालयात झाले. कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती अनिल किलोर, न्या. वृषाली जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments