झरीची सांस्कृतिक लोकधारा

 झरीची सांस्कृतिक लोकधारा

          ​ यवतमाळ जिल्ह्याच्या आग्नेय (दक्षिण-पूर्व) टोकाला वसलेला झरी जामणी तालुका म्हणजे निसर्गाची अफाट समृद्धीच आहे. हा तालुका महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर पैनगंगा नदीच्या तीरावर असलेला आहे.

          प्राचीन आदिवासी संस्कृती आणि आधुनिक उद्योगांचा एक अनोखा मेळ घालून समृद्धीच्या दिशेने झेपावणाऱ्या प्रदेशांपैकी एक अशी आजची झरी आहे. जिल्ह्याच्या मुख्य प्रवाहापासून काहीसा दूर असला, तरी भौगोलिक स्थान, खनिज संपत्ती आणि व्यापाराच्या दृष्टीने या भागाला अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. जरी 'झरी' हे तालुक्याचे प्रशासकीय केंद्र असले, तरी तालुक्यातील 'मुकुटबन' हेच या परिसराची आर्थिक, औद्योगिक आणि दळणवळणाची मुख्य भूमी मानले जाते.

​          समृद्ध आदिवासी संस्कृती आणि लोकजीवन हीच ​झरी तालुक्याची खरी ओळख बनली आहे, ही येथील आदिवासी बहुल लोकसंख्येत दडलेली विविधता आहे. या भागात मुख्यत्वे आदिवासी जमातीचे नागरिक पिढ्यानपिढ्या गुण्यागोविंदाने राहत आले आहे.

​गोंडी भाषा आणि चालीरीती या भागाचे सांस्कृतिक वैभव वाढवताना दिसतात. निसर्गालाच देव मानणारी यांची जीवनशैली अतिशय साधी आणि आजही पर्यावरणाशी जोडलेली दिसते.

​          सण-उत्सवांच्या वेळी सादर केले जाणारे 'दंढार' आणि 'ढेमसा' ही पारंपरिक लोकनृत्ये येथील लोकजीवनाचा आत्मा असल्याचे जाणवते. या नृत्यांमधून आदिवासी समाजाचा इतिहास, निसर्गप्रेम आणि उत्सवप्रियता स्पष्टपणे दिसून येते.

​          तसे पहायचे झाल्यास झरी तालुक्याला निसर्गाचे वरदान प्राप्त आहे. श्रावणात हे सौंदर्य अधिकच बहरते. ​यवतमाळ जिल्हा हा 'पांढऱ्या सोन्याचा' म्हणजेच कापसाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे आणि झरी तालुक्यातील कापसाचे भरमसाठ होणारे पीक जिल्ह्याचा लौकिक वाढवण्यास मदतच करते. येथील सुपीक जमिनीत कापूस (कपाशी) हे मुख्य नगदी पीक म्हणून घेतले जाते. इथे जास्त प्रमाणात शेतकरी कोरडवाहू शेती करतात, तरीही कापूस पिकामुळे आर्थिक सुबत्ता टिकून आहे. त्यासोबतच सोयाबीन, तूर, हरभरा, ज्वारी आणि तीळ ही पिकेही मोठ्या प्रमाणात घेतली जाते.

​           तालुक्याचा मोठा भाग घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. त्यामुळे शेतीसोबतच तेंदूपत्ता संकलन, मोहाची फुले गोळा करणे, बांबू व विविध औषधी वनस्पती एकत्र करून त्यांची विक्री करणे, हा स्थानिकांच्या उपजीविकेचा एक मुख्य भाग बनतो. तालुक्याचे वैशिष्ट्य म्हणजे मुकूटबन येथील ब्रिटिश कालीन तलावात शिंगाड्याचे पीक घेतले जाते, त्यामुळे मुकुटबन शिंगाड्यासाठी प्रसिद्ध आहे.

          उदयोगाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास मुकूटबन व आजूबाजूचा परीसर अतिशय समृद्ध आहे. भूगर्भातील खजिना आणि मुकुटबनचा औद्योगिक विकास आता देशात नावारूपास येताना दिसतो आहे. ​झरी जामणी तालुक्याला निसर्गाने केवळ वर जमिनीवरच नव्हे, तर भूगर्भातही अफाट संपत्ती वरदानाप्रमाणे लाभली. या तालुक्यात आणि विशेषतः मुकुटबन परिसरात उच्च दर्जाच्या चुनखडीचे (Limestone) आणि दगडी कोळशाचे (Coal) अफाट साठे मिळालेले आहे. त्यामुळे मागील दशकापासून ​मुकुटबनची ओळख तालुक्याचे 'आर्थिक इंजिन' अशीच बनली आहे. मुकुटबन हे केवळ एक गाव नसून तालुक्याची मुख्य बाजारपेठ असल्याचे पाहायला मिळते. येथील चुनखडीच्या साठ्यांमुळे येथे 'एम. पी. बिर्ला ग्रुप' सारखा भव्य सिमेंट प्रकल्प उभारला गेला आहे. या कारखान्यामुळे संपूर्ण परिसराचे औद्योगिकीकरण झाले असून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत.

​          ​झरी तालुका दुर्गम आणि सीमावर्ती भाग असूनही वाहतूक आणि दळणवळणाच्या बाबतीत मुकुटबनचे स्थान मोक्याचे आहे कारण तालुक्याला लागूनच चंद्रपूर जिल्ह्याची सीमा आहे आणि तेलंगणा राज्यातील आदीलाबाद जिल्ह्याची सीमासुद्धा आहे.

​          पिंपळखुटी-माजरी या महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर मुकुटबन रेल्वे स्टेशन वसलेले आहे.​ या रेल्वे लाईनमुळे हा तालुका थेट वणी, चंद्रपूर, नागपूर आणि तेलंगणातील आदिलाबादशी जोडला गेला आहे. सिमेंट कारखान्यातील मालवाहतूक असो वा स्थानिकांचा प्रवास, रेल्वेमुळे या भागाच्या विकासाला मोठी गती मिळाली असल्याचे दिसून येते.

          ​पर्यटनाच्या दृष्टीने या भागात निसर्गप्रेमींसाठी अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथील हिरवेगार डोंगर, लहान-मोठे नैसर्गिक धबधबे आणि नद्यांचे पात्र आणि तलाव पर्यटकांना भुरळ पाडते. ताडोबा, कावल आणि पैंनगंगा या जंगलांना जोडणारा हा एक महत्त्वाचा 'बायोलॉजिकल कॉरिडोअर' मानला जातो.

​          मुकुटबन आणि झरी परिसरातील प्राचीन ग्रामदैवतांची मंदिरे व वार्षिक यात्रा येथील स्थानिक लोकसंस्कृतीचे दर्शन घडवतात. दाट जंगलांमुळे येथे विविध प्रकारचे वन्यजीव, पक्षी आणि दुर्मिळ वनस्पतींचे दर्शन घडते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध टिपेश्वर अभयारण्य झरी तालुक्याला लागून असलेल्या केळापूर तालुक्यात स्थित आहे. 

           ​एकीकडे उद्योगांची साथ असताना, दुसरीकडे सीमावर्ती व दुर्गम भाग असल्यामुळे काही आव्हाने आजही कायम आहेत. ग्रामीण भागातील आरोग्याच्या सुविधा, उच्च शिक्षणाच्या संधी आणि सिंचनाचे जाळे वाढवणे गरजेचे झाले आहे. औद्योगिक विकास होत असतानाच येथील घनदाट जंगले आणि आदिवासी संस्कृतीचे रक्षण करणे हेही मोठे आव्हान आहे.

           झरी जामणी तालुका आणि मुकुटबन हे निसर्गरम्य वातावरण, परंपरा जपणारा आदिवासी समाज, खनिज संपत्ती आणि आधुनिक उद्योग यांचे एक अप्रतिम उदाहरण म्हणून पहावयास मिळते. झरीची शांत, सांस्कृतिक पाळेमुळे आणि मुकुटबनची औद्योगिक ताकद एकत्र येऊन या परिसराला महाराष्ट्राच्या नकाशावर एक वेगळी व प्रगतीशील ओळख मिळवून देतील आता यात शंका नाही.

                                              -ॲड. प्रफुल भोयर





Post a Comment

0 Comments