राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त रॅली व शिबिराचे आयोजन
यवतमाळ, दि.19 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त कायदेविषयक शिबिर व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश-२ ए.ए. लऊळकर होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ विधिज्ञ अमरचंद दर्डा, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय जैन, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव के.ए. नहार तसेच मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, वकील मंडळी, अमोलकचंद विधी महाविद्यालय व महात्मा जोतीराव व सावित्रीबाई जोतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, पॅरा विधी स्वयंसेवक उपस्थित होते.
यावेळी न्या.लऊळकर यांनी दि. ११ ऑक्टोंबर १९८७ रोजी कायदेशिर सेवा प्राधिकरण कायदा जाहीर करण्यात आला होता व नोव्हेंबर १९९५ मध्ये हा कायदा लागू करण्यात आला. यामधुन समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांना कायदेविषयक मदत पुरविण्यासाठी आणि समर्थन देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामार्फत दि.९ नोव्हेंबर १९९५ पासुन राष्ट्रीय विधी सेवा दिनाची सुरूवात करण्यात आली, असे सांगितले. तसेच विधी सेवा देतांना सर्वांनी वाटा उचलणे सुध्दा तेवढेच आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सचिव के.ए. नहार यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच मोफत विधी सेवा उपलब्ध करून देण्याबाबतची माहिती दिली. राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या. वरिष्ठ विधिज्ञ अमरचंद दर्डा यांनी राष्ट्रीय विधी सेवा दिन का साजरा केला जातो याबाबत माहिती दिली.
कार्यक्रमानंतर रॅली काढण्यात आली. जिल्हा न्यायाधीश-२ ए. ए. लऊळकर यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. रॅली मुख्य चौकातुन फिरत जिल्हा व सत्र न्यायालयात समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार उपमुख्य लोकअभिरक्षक हर्षवर्धन देशमुख यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने न्यायिक अधिकारी, वकील मंडळी तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
@District Court Yavatmal |
No comments:
Post a Comment