राष्ट्रीय लोकअदालतमध्ये 13 हजार 521 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली
तडजोड प्रकरणांचे मुल्य 12 कोटी 31 लाख
लोकअदालतीने सावरला 14 जोडप्यांचा संसार
जुनी 88 हून अधिक प्रकरणे सामंजस्याने निकाली
यवतमाळ, दि.30 (जिमाका) : राष्ट्रीय व राज्य विधीसेवा प्राधिकरणच्या निर्देशान्वये जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. जिल्हाभर या अदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये 13 हजार 521 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. या प्रकरणांचे तडजोड मुल्य तब्बल 12 कोटी 31 लाख 42 हजार 992 इतके आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष नागेश न्हावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. लोकअदालतचे उद्घाटन न्यायाधीश श्री.न्हावकर यांच्याहस्ते झाडाला पाणी देवुन करण्यात आले. यावेळी प्राधिकरणचे सचिव के.ए.नहार, जिल्हा न्यायाधीश-1 व्ही. बी. कुलकर्णी, जिल्हा वकील संघाचे सचिव मोहन गिरटकर तसेच जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायीक अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार व ईतर मंडळी उपस्थित होती.
राष्ट्रीय लोकअदालतमध्ये न्यायालयात प्रलंबित व वादपुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँका व विशेषत: जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत कराबाबतची वादपुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. ही प्रकरणे मोठ्या संख्येने आपसी तडजोडीने मिटविण्यासाठी अध्यक्ष नागेश न्हावकर व सचिव के.ए. नहार व जिल्ह्यातील न्यायाधीशांनी यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यासाठी वेळोवेळी शासकीय अधिकारी, वकील, पक्षकार, विविध संस्था व राष्ट्रीयकृत बँकेतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या व त्यांना राष्ट्रीय लोकअदालतचे महत्व पटवून सांगितले.
लोकअदालतमध्ये पक्षकारांना स्वच्छेने व सामंजस्याने वाद अंतिमरित्या मिटविता येतो याची खात्री पटल्यामुळे जिल्ह्यामध्ये 2 हजार 535 प्रलंबित प्रकरणे व 10 हजार 986 वादपूर्व प्रकरणे असे एकूण 13 हजार 521 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली निघाली. निकाली निघालेल्या प्रकरणांचे एकूण तडजोड मूल्य रूपये 12 कोटी 31 लाख 42 हजार 992 इतके आहे. विशेष मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व न्यायालयातून 1 हजार 196 प्रकरणे निकाली काढण्यात आली तसेच 14 जोडप्यांचा संसार सावरला. विशेष म्हणजे पाच व दहा वर्ष जुनी 88 हून अधिक प्रकरणे निकाली निघाली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समित्या तसेच सर्व न्यायाधीश व कर्मचारी यांनी लोकअदालत यशस्वी करण्याकरीता अथक परिश्रम घेतले. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हा सरकारी वकील, सहायक सरकारी वकील, उपजिल्हाधिकारी, भू-अर्जन अधिकारी, बेंबळा प्रकल्पाचे अधिकारी, बँका, संस्थांचे अधिकारी, विमा कंपन्याचे अधिकारी, पोलिस अधिकारी, एसटीचे विभाग नियंत्रक, वकील मंडळी, स्वयंसेवक तसेच न्यायालयीन, जिल्हा व तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी यांनी लोकअदालत यशस्वी करण्याकरीता मोलाचे सहकार्य केले.
No comments:
Post a Comment