20 December 2024

मानसिक आरोग्य बळकटीसाठी ध्यानाची कास धरावी




◆ विधी महाविद्यालयात प्रथम ध्यान दिन साजरा

यवतमाळ:- संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी व जागतीक ध्यान दिवस निमित्त स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रथम ध्यान दिन साजरा करण्यात आला. डॉ. स्वप्नील सगणे सर, तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग चे  प्रशिक्षक चेतना साईकर, डॉ. श्याम गाडवे, डॉ. मिनाक्षी गाडवे , ॲड. राजश्री ठाकरे यांच्या माध्यमातून ध्यानाचे महत्व अधोरेखित करण्यात आले.  
         सध्याच्या धावपळीच्या युगात मनाला शांत ठेवण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यासाठी योगा सोबत ध्यानाचा सराव महत्वाचा ठरत आहे. मनाला प्रशिक्षित करण्यासाठी मानसिक स्पष्टता, भावनिक शांतता आणि शारीरिक विश्रांतीची स्थिती प्राप्त करण्यासाठी, सजगता, लक्ष केंद्रित किंवा एकाग्र विचार यासाठी ध्यान या तंत्राचा वापर महत्वाचा ठरतो. ध्यानामुळे ताण कमी होतो, चिंता आणि नैराश्य कमी होते, झोपेची गुणवत्ता सुधारते, लक्ष केंद्रित होऊन ऊर्जा मिळते. ध्यानाचे महत्व विद्यार्थ्यांना कळुन शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी लक्ष केंद्रित होऊन परीक्षेच्या काळात मन शांत राहण्यासाठी ध्यान फायद्याचे आहे असे सांगून यावेळी ध्यानाचे महत्व उपस्थितांना अवगत करुन दिले.
      या प्रसंगी स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ, यवतमाळचे प्राचार्य डॉ. विजेश मुनोत सर, डॉ. स्वप्नील सगणे सर, डॉ. संदीप नगराळे सर, डॉ. वैशाली फाळे मॅडम, प्रा.अंजली दिवाकर मॅडम, प्रा. वंदना पसारी मॅडम, प्रा. पल्लवी हांडे मॅडम, प्रा. अमिता मुंदडा मॅडम, प्रा. योगिता बोरा मॅडम, प्रा. अक्षिता जयस्वाल मॅडम, डॉ.शंतनू  कनाके, प्रा. मृणाल काटोलकर मॅडम तसेच विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.







 




18 December 2024

अल्पसंख्याक हक्क दिवस जिल्हाधिकारी कार्यालय येथे साजरा....


बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ

 

अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक....

अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक 
                             - प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान

आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त


नागपूर,दि. 18 : माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तिला अधिक माहिती सक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच ‘एआय’  ने उपलब्ध करून दिला आहे. आपल्या मातृभाषेतून मिळणा-या ज्ञानाला ज्या मर्यादा होत्या, त्या मर्यादा आता ‘एआय’ च्या माध्यमातून कमी झाल्या आहेत. ज्या भाषेत आपल्याला माहिती हवी आहे, त्या भाषेत ती सहजरित्या उपलब्ध होते. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेपासून दूर राहण्याऐवजी तंत्रज्ञान समजून घेणे आणि आपल्या वापरातून ते अधिक परिपूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह  यांनी केले.
नागपूर प्रेस क्लब आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक नागपूर कार्यालयाच्या वतीने ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स इन जर्नालिझम’ (कृत्रिम बुद्धिमत्ता  आणि पत्रकारिता) या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

 ज्येष्ठ पत्रकार तथा माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर - अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे, माहिती संचालक किशोर गांगुर्डे, दयानंद कांबळे उपस्थित होते.    

श्री. ब्रिजेश सिंह म्हणाले, कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले की नोक-या कमी होतील, अशी एक भीती व्यक्त होत असते. मात्र तंत्रज्ञानातून नवनवीन संधी निर्माण झाल्याची प्रचिती आपण आजवर घेत आलो आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीतही अशीच भीती व्यक्त केली जात आहे. वास्तविक याचा परिपूर्ण वापर जर करता आला नाही, तर संबंधितांना आपल्या नोक-या गमाविण्याची भीती अधिक आहे. हे माध्यम वापरतांना मात्र प्रत्येकाला अगोदर स्वत:ला सिध्द करावे लागेल. एआयच्या माध्यमातून जी काही माहिती आपल्यासमोर येईल, त्या माहितीला अधिक पडताळून घेणे, त्यात असलेल्या त्रृट्या दुरूस्त करून अधिक परिपूर्ण करणे, अशा माहितीला नैतिक व संवैधानिक दृष्टीने पडताळून पाहणे व दक्ष राहून चुका दुरुस्त करणे, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलतांना दिला.

आज विविध समाजमाध्यमांचा लोकांवर प्रचंड प्रभाव आहे. यात अनेक धोके आहेत. एखादी व्यक्ती गाफील राहून आपल्या मोबाईलवर आलेल्या चुकीच्या संदेशाला बळी पडला तर त्याला आर्थिक फसवणुकीलाही तोंड द्यावे लागते, याची अनेक उदाहरणे आहेत. यातील भीती बाजुला सारून आपण दक्ष असायला हवे. इतर प्राणीमात्रांबद्दल व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून ज्या मानवतेच्या दृष्टीने आपण त्यांना पाहतो, त्याच दृष्टीमध्ये संवैधानिक व सत्य -असत्य या परिभाषेत सावध होत ‘एआय’ ला आपण जवळ केले पाहिजे. कोणतीही उत्सुकता ही ज्ञानाच्या स्त्रोतांपर्यंत आपल्याला घेऊन जात असते. पुर्वी या उत्सुकतेला आपण गुगलची जोड देऊन समाधान करून घेतले. आता या उत्सुकतेचे अधिक पुढचे पाऊल म्हणून एआय मार्फत मिळणा-या माहितीकडे पाहावे लागेल, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे म्हणाले, आपल्यामध्ये मुळात असलेल्या गुणवत्तेसोबतच कृत्रीम बुध्दीमत्तेचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. भारत विरोधी कृत्य करण्यासाठी एआय चा वापर होणार नाही, यासाठी एआय ची माहिती भारतीय पध्दतीने तयार करणे आवश्यक आहे. मराठी भाषेलासुध्दा एआय शी जोडावे लागणार आहे. तसेच अशा कार्यशाळांचे अधिकाधिक आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही राहुल पांडे यांनी व्यक्त केली. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी केले. संचालन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी तर आभार माहिती संचालक दयानंद कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार बाळ कुलकर्णी, धमेंद्र झोरे, भुपेंद्र गणवीर यांच्यासह विविध माध्यमातील पत्रकार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच राज्यातील जिल्हा माहिती कार्यालये आणि विविध पत्रकारिता संस्थांनी ऑनलाईन पध्दतीने व्याख्यानाचा लाभ घेतला. 
 



14 December 2024

राष्ट्रीय लोकअदालतीत 16 हजारावर प्रकरणे सामंजस्याने निकाली....

 राष्ट्रीय लोकअदालतीत 16 हजारावर प्रकरणे सामंजस्याने निकाली


◆ प्रकरणांचे तडजोड मुल्य 23 कोटी 67 लाख

◆लोकअदालतीचे सावरला 11 जोडप्यांचा संसार

◆पाच व दहा वर्ष जूनी 116 प्रकरणे निकाली

यवतमाळ, दि.16 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीस प्रचंड प्रतिसाद लाभला. यामध्ये 16 हजार 259 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली निघाली. सर्व प्रकरणांचे तडजोड मूल्य 23 कोटी 67 लाख ईतके आहे. विशेष म्हणजे 11 जोडप्यांचा संसार लोकअदालतीने सावरला.

          प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीस तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नागेश न्हावकर यांच्या मार्गदर्शनात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्याच हस्ते झाडाला पाणी देवुन लोकअदालतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव के.ए. नहार, जिल्हा न्यायाधीश-१ अ.अ.लउळकर, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय जैन तसेच जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायीक अधिकारी, कर्मचारी, पक्षकार व ईतर मंडळी उपस्थित होती.

          लोकअदालतमध्ये न्यायालयात प्रलंबित व वादपुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँका, ग्रामपंचायत कराची वादपुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. प्रकरणे आपसी तडजोडीने मिटविण्यासाठी न्या.नागेश न्हावकर, न्या.के.ए. नहार तसेच सहकारी न्यायाधीशांनी अथक परिश्रम घेतले. वेळोवेळी शासकीय अधिकारी, वकील, पक्षकार, विविध संस्था व राष्ट्रीयकृत बँकेतील अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या व त्यांना राष्ट्रीय लोकअदालतचे महत्व पटवुन दिले.

          लोकअदालतमध्ये स्वच्छेने व सामंजस्याने वाद अंतिमरित्या मिटविता येते याची खात्री पटल्यामुळे जिल्ह्यामध्ये २ हजार ९४६ प्रलंबित प्रकरणे व १३ हजार ३१३ वादपूर्व प्रकरणे असे १६ हजार २५९ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली निघाली. निकाली प्रकरणांचे तडजोड मुल्य २३ कोटी ६७ लाख ३१ हजार ७४२ आहे. विशेष मोहिमेंतर्गत १ हजार ३२१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. लोकअदालतमध्ये ११ जोडप्यांचा संसार सावरला. विशेष म्हणजे ३० वर्षे जुने प्रकरण महागांव न्यायालयात निकाली काढण्यात आले. तसेच ११६ हुन अधिक पाच वर्षे व दहा वर्षे जुनी प्रकरणे समझोत्याने निकाली निघाली.

        जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समित्या तसेच सर्व न्यायाधीश व कर्मचारी यांनी राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्याकरीता परिश्रम घेतले. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा सरकारी वकील, सहायक सरकारी वकील, उपजिल्हाधिकारी, भू-अर्जन अधिकारी, बेंबळा प्रकल्पाचे अधिकारी व सहकारी, बँका, संस्था, विमा कंपन्याचे अधिकारी, पोलिस अधिकारी, एसटीचे विभाग नियंत्रक, वकील मंडळी आणि स्वयंसेवक तसेच जिल्ह्यातील सर्व न्यायालयीन कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.









07 December 2024

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम....

 जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम


यवतमाळ, दि.9 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने येथील सभागृहात मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर होते.
         कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव के. ए. नहार तर प्रमुख वक्ते म्हणून आर. आय. सोनवने तसेच वकील मंडळी, विधी महाविद्यालयातील विद्यार्थी, पीएलव्ही व बँक कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रशिक्षित मध्यस्थ न्यायाधीश आर.आय.सोनवने यांनी मध्यस्थी काळाची गरज तसेच त्याचे सर्वतोपरी फायदे यावर मार्गदर्शन केले.

      त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष एन. व्ही. न्हावकर यांनी मध्यस्थी प्रक्रियेबाबत उदाहरण देतांना सांगितले की, वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी प्रक्रिया खुप महत्वाची आहे. दोन्ही पक्षकारांमध्ये तडजोड करण्यासाठी प्रशिक्षित मध्यस्थ असणे आवश्यक आहे. मध्यस्थीमुळे दोन्ही पक्षकारामध्ये वाद हा सहजासहजी मिटू शकते. तसेच वकीलांनी पक्षकारांना मध्यस्थी मध्ये सामावून घ्यायला पाहिजे. मध्यस्थी प्रक्रियेमध्ये वकीलांची भुमिका खुप महत्वाची असते. तडजोडीकरीता वकीलांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन मध्यस्थी प्रक्रियेमध्ये काम करावे व दोन्ही पक्षकारामध्ये तडजोड कशाप्रकारे होऊ शकते हे पाहावे. त्यामुळे मध्यस्थी प्रक्रिया प्रभावीपणे काम करु शकते, असे यावेळी त्यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये सांगितले.

         कार्यक्रमाचे आभार सचिव के ए. नहार यांनी मानले. संचलन ९ वे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर श्रीमती आर. एस. मोरे यांनी केले.






कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...