मराठी असे आमुची मायबोली
महाराष्ट्राला विपुल साहित्य संपदा आणि नावाजलेले प्रतिभाशाली साहित्यिक लाभले आहे. त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या आणि अफाट ज्ञानाच्या जोरावर तळागाळात जाऊन प्रबोधन केले आहे. यामुळे अनेक अनिष्ट चालीरीती वर काळाचा पडदा टाकता आला आणि अनेकांना चालीरितीच्या बंदीस्त चाकोरीतून बाहेर यायला मदत झाली. प्रत्येक साहित्यिकांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी आपण जयंती, पुण्यतिथी साजरी करत असतो, मात्र त्यांच्या कार्याचा आपण आपल्या जीवनात सकारात्मक वापर करतो का? आणि केला तरी आचरण कितपत सुधारते आहे , हे पाहणं जास्त महत्वाचं ठरत.
मानव संस्कृतीच्या वाटचालीत ग्रंथालये व वाचनालयांचे योगदानही महत्वाचे ठरलेले आहे. त्यांनी वर्तमानपत्र वा पुस्तक खरेदी शक्य नसलेल्यांना वाचनासाठी सामुदायिक सुविधा उभारून चालना दिलेली आहे. म्हणूनच ही ग्रंथालये वा वाचनालये अशा वाचन संस्कृतीचे खरे प्रेरणास्रोत आहेत.
जगातल्या खर्याखुर्या संपत्तीचे साठे अशा वाचनालयात ग्रंथालयात साठवून ठेवलेले आहेत. संसार आणि जगण्याच्या विवंचनेत फसलेल्या माणसाला, या विचारधनाकडे आणायचे काम वाचन संस्कृती करतात म्हणून वाचन संस्कृती टिकून रहायला हवी.
ग्रंथालयाच्याही पलिकडे जाऊन आता लोक पुस्तक खरेदीत पुढे येऊ लागले आहेत. सुखवस्तू लोकांच्या घराच्या एका भिंतीवर पुस्तकांचा कप्पा, कपाट दिसते, त्यामागची प्रेरणा वाचनातून आलेली असते. मुठभर का होईना पुस्तके घरात असावी, असे वाटणारी प्रवृत्ती वाढते आहे. नुसत्या अक्षरांनी, शब्दांनी व पुस्तकांनी जग किती आरपार बदलून टाकलेले आहे.
वाचनाचे रोजच्या जीवनात होणारे फायदे लक्षात घेता, वाचन संस्कृती मजबूत बनवण्यासाठी तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी २१ फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन* ते २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन यादरम्यान आपण *मराठी असे आमुची मायबोली* हा साप्ताहिक कार्यक्रम राबवित आहो.
No comments:
Post a Comment