21 February 2023

मराठी असे आमुची मायबोली...

                    मराठी असे आमुची मायबोली 

          महाराष्ट्राला विपुल साहित्य संपदा आणि नावाजलेले प्रतिभाशाली साहित्यिक लाभले आहे. त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या आणि अफाट ज्ञानाच्या जोरावर तळागाळात जाऊन प्रबोधन केले आहे. यामुळे अनेक अनिष्ट  चालीरीती वर काळाचा पडदा टाकता आला आणि अनेकांना चालीरितीच्या बंदीस्त चाकोरीतून बाहेर यायला मदत झाली. प्रत्येक साहित्यिकांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी आपण जयंती, पुण्यतिथी साजरी करत असतो, मात्र त्यांच्या कार्याचा आपण आपल्या जीवनात सकारात्मक वापर करतो का? आणि केला तरी आचरण कितपत सुधारते आहे , हे पाहणं जास्त महत्वाचं ठरत.

          मानव संस्कृतीच्या वाटचालीत ग्रंथालये व वाचनालयांचे योगदानही महत्वाचे ठरलेले आहे. त्यांनी वर्तमानपत्र वा पुस्तक खरेदी शक्य नसलेल्यांना वाचनासाठी सामुदायिक सुविधा उभारून चालना दिलेली आहे. म्हणूनच ही ग्रंथालये वा वाचनालये अशा वाचन संस्कृतीचे खरे प्रेरणास्रोत आहेत.

          जगातल्या खर्‍याखुर्‍या संपत्तीचे साठे अशा वाचनालयात ग्रंथालयात साठवून ठेवलेले आहेत. संसार आणि जगण्याच्या विवंचनेत फसलेल्या माणसाला, या विचारधनाकडे आणायचे काम वाचन संस्कृती करतात म्हणून वाचन संस्कृती टिकून रहायला हवी.

           ग्रंथालयाच्याही पलिकडे जाऊन आता लोक पुस्तक खरेदीत पुढे येऊ लागले आहेत. सुखवस्तू लोकांच्या घराच्या एका भिंतीवर पुस्तकांचा कप्पा, कपाट दिसते, त्यामागची प्रेरणा वाचनातून आलेली असते. मुठभर का होईना पुस्तके घरात असावी, असे वाटणारी प्रवृत्ती वाढते आहे. नुसत्या अक्षरांनी, शब्दांनी व पुस्तकांनी जग किती आरपार बदलून टाकलेले आहे.

          वाचनाचे रोजच्या जीवनात होणारे फायदे लक्षात घेता, वाचन संस्कृती मजबूत बनवण्यासाठी तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी २१ फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन* ते २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन यादरम्यान आपण *मराठी असे आमुची मायबोली* हा साप्ताहिक कार्यक्रम राबवित आहो.

15 February 2023

रक्तदानाने श्री. संत सेवालाल महाराज जयंती साजरी....

 श्री. संत सेवालाल महाराज जयंती साजरी

बोदेगावात रक्तदानाचा उत्सव


          श्री. संत सेवालाल महाराज हे जगातील प्रत्येक बंजारा समाजातील लोकांचे आराध्यदैवत आहे. जगण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या व विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गात असणाऱ्या बंजारा समाजाला जगण्याचा मार्ग दाखविला. प्रगतीशील देशासोबत कसे चालता येईल हे हि सांगितले. एवढेच नाही तर त्यांनी त्या काळात सांगितलेल्या गोष्टी ह्या काळात सुद्धा लागू पडत आहेत.

त्यांचा हा वारसा पुढे घेऊन समाज बांधव आपली प्रगती साधताना दिसत आहे.

          आज दारव्हा तालुक्यातील बोदेगाव येथे श्री संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त बोदेगावात रक्तदानाचा उत्सव साजरा झाला. भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून श्री. सेवालाल महाराजांना आदरांजली वाहिली.

       समाजाला मानवतेची शिकवण मिळावी यासाठी काही मानवी मूल्याची संवर्धन करणे गरजेचे असते, त्यांच्या या शिकवणीतून आज रक्तदानाने श्री. संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.

      यावेळी कार्यक्रमात रक्तदानांसाठी गावातील तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. समाजातील एकीचे बळ लक्षात घेता, तब्बल ६१ लोकांनी रक्तदान करून सामाजिक धर्म जोपासला. सौ. जयश्री यशवंत राठोड आणि श्री. यशवंत प्रयाग राठोड  या दाम्पत्याने रक्तदान करून शिबिराची सुरुवात केली. यासाठी श्री. वसंतराव नाईक शासकीय रक्तपेढी यवतमाळ यांचे चमूनी रक्तसंकलन केलं.

          तर प्रमोद चव्हाण, धीरज राठोड, दत्ता चव्हाण, विनोद राठोड, अविनाश आडे, रुपेश चव्हाण, जगदीश राठोड, हर्षद राठोड, वैभव चव्हाण, रोशन राठोड, प्रमोद राठोड, जितेश चव्हाण, रक्त मित्र प्रफुल भोयर, पंकज राठोड, सुनील आडे तसेच श्री. संत सेवालाल महाराज मित्रमंडळ आणि गावातील तरुणांनी विशेष मेहनतीने कार्यक्रम यशस्वी ठरवला. यावेळी महिलांचा सहभाग स्मरणीय ठरला.



















कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...